पुरोहितांच्या मंत्रघोषात देवमामलेदार महाराजांची विधिवत महापूजा.सपन्न.
अपु्र्व उत्साहात रथोत्सवास प्रारंभ.

सटाणा | प्रतिनिधी दि १५
देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवास सोमवार (दि. १५) रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता तहसीलदार कैलास चावडे, प्रतिभा चावडे, प्रशासक ज्योती भगत, स्वनिल पाटील, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड व विश्वस्तांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रघोषात महाराजांची विधिवत महापूजा करण्यात आली. मंदिराचा गाभारा विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.मंदिर परिसरात सडा-रांगोळी व आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. ‘देवमामलेदार यशवंतराव महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.दुपारी चार वाजता. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रथ पुजन करुन रथ ओढण्यात आला.दहा बँड पथक,भजनी मंडळे, लेझीम पथके सहभागी झाले आहेत.
मिरवणूक मार्गावरील प्रत्येक घरासमोर रथाचे पूजन करण्यात येत होते.यात्रोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी, एक दंगा नियंत्रण पथक, १५० स्वयंसेवक तसेच साध्या वेशातील पोलीस तैनात आहेत.यात्रेनिमित्त तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार सजविण्यात आले आहे. कार्यालय आवारात सुंदर रांगोळी काढण्यात आली. तहसीलदार कार्यालयात देवमामलेदार बसत असत त्या खुर्चीची तहसीलदार कैलास चावडे यांनी सपत्नीक पूजा केली.तर कार्यालय आवारातील देवमामलेदार मंदिरात माजी नगरसेवक किशोर कदम व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खामखेडा (ता. देवळा) येथील अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने ह.भ.प. सुभाष बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सटाण्यात दाखल झाली. देवस्थानच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले.

