नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व व मतदानाचा अधिकार
अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढणार
मुंबई : दि. २४
नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व तसेच मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
सध्याच्या तरतुदीनुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी पात्र असलेली व्यक्ती सदस्य म्हणूनही निवडून येण्यास पात्र असते. त्यामुळे एखादी व्यक्ती अध्यक्ष तसेच सदस्य अशा दोन्ही पदांवर निवडून येऊ शकते आणि दोन्ही पदांसाठी तिला जनतेचा जनादेश मिळालेला असतो.
या पार्श्वभूमीवर अधिनियमात सुधारणा करून थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. तसेच अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असेल. मतांची संख्या समान झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मत (Casting Vote) देण्याचा अधिकार कायम राहणार आहे.
या सुधारणेमुळे थेट निवडून आलेले अध्यक्ष व सदस्यांमधून निवडून आलेले अध्यक्ष यांना समान जनादेश असल्याची भूमिका स्पष्ट होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

