गोराणे जि.प. शाळेत माजी विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन .
आनंददायी शनिवार उपक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन.

प्रतिनिधी – सटाणा. दि. 13
गोराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार या सत्राअंतर्गत ‘माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिनेश देसले होते. यावेळी डॉ. रविंद्र देसले यांनी वैद्यकीय सेवा व आरोग्य क्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली. सैन्य दलातील चेतन देसले यांनी देशसेवेचे महत्त्व सांगत सीमा सुरक्षा दलात निवड होण्यामागील तयारी व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील अमृत देसले यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध सेवा व संधी स्पष्ट केल्या. तर कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी सुनील जाधव यांनी ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने शिक्षण घेतल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सरपंच दिनेश देसले यांनी स्पर्धा परीक्षा, सार्वजनिक जीवन व राजकीय क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यशवंत देसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर देसले, मंगेश देसले, सर्व अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किरण अहिरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षिका भाग्यश्री देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका स्मिता गायकवाड, माधुरी भामरे आणि जयश्री पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

