खामखेडा, सावकी, पिळकोस परीसरात दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा सुरू करा.,
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार खामखेडा सरपंच वैभव पवार यांचा इशारा.

प्रतिनिधी- सटाणा. दि. 12
देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी आणि पिळकोस परिसरातील शेती पाण्याअभावी अडचणीत सापडली असून दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, व वारंवार खंडीत होणारा सिंगल फेज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खामखेडा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी महावितरणला दिला आहे.याबाबत ठेंगोडा विभागाचे सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच श्रावण बोरसे उपस्थित होते.
निवेदनात नमूद म्हटले आहे की खामखेडा येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातून तीन गावांना वीजपुरवठा केला जातो. सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे पिकांना वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. मात्र थ्री-फेज वीज फक्त रात्री उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत शेतात जावे लागते. परिसरात बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा वाढता वावर पाहता रात्रीची शेती जीवघेणी ठरत आहे. सध्या परीसरात बिबट्याचा संचार सुरु आहे.बिबट्या बकऱ्या, मेंढ्या व गुरांवर हल्ले करीत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.बिबट्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर, सिंगल फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून कृषी पंप सुरू ठेवण्यात शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. वीज पुरवठा सुरळीत व अखंडित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच पवार व माजी उपसरपंच श्रावण बोरसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

