हृदयविकारापासून बचाव करणाऱ्या औषधास परवानगी
अमेरिका औषध प्रशासनाची मान्यता,चार वर्षाच्या अभ्यासानंतर निष्कर्ष
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ने प्रथमच टाइप-२ मधुमेह (डायबिटीज) असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तोंडावाटे घेतले जाईल अशा जीएलपी-१ रिसेप्टर एगोनिस्ट औषधाला मान्यता दिली आहे. या औषधाचे नाव राइवेल्सस असे आहे. या मान्यतेनंतर हे औषध लवकरच अमेरिकेसह जगभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
२०१९ मध्ये बाजारात आलेल्या राइवेल्ससला आता नवी मान्यता मिळाली आहे. यानुसार, हृदयविकारासंबंधी गुंतागुंत टाळण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो, रुग्णाला यापूर्वी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आला नसेल तरीही. हा निर्णय एका चाचणीच्या निष्कर्षांवर आधारीत आहे, ज्यामध्ये ९,६५० टाइप-२ मधुमेह रुग्णांवर चार वर्षांपर्यंत अभ्यास करण्यात आला.
दररोज १४ मि.ग्रॅ. राइवेल्सस घेतल्याने मुख्य हृदयविकारासंबंधीचा धोका १४% पर्यंत कमी झाला. ज्यांना यापूर्वी कधीही हृदयाची समस्या नव्हती अशा रुग्णांमध्येही त्याचा चांगला परिणाम दिसून आला असे अभ्यासात आढळले आहे. या चाचणीत असे आढळले की गंभीर दुष्परिणाम राइबेल्सस घेणाऱ्यांमध्ये कमी (४७.९%) होते, तर प्लेसीबो गटात हे ५०.३% होते. तथापि, उलटी आणि मळमळ यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या थोड्या जास्त प्रमाणात दिसल्या. एकूण १५.५% रुग्णांनी दुष्परिणामांमुळे औषध बंद केले. नोवो नॉर्डिस्क एफडीएकडे या औषधाला लठ्ठपणा नियंत्रणासाठीही मान्यता देण्याची मागणी करत आहे. मान्यता मिळाल्यास राइवेल्सस हे पहिले असे तोंडी औषध बनेल, जे हृदयाचे संरक्षण आणि वजन नियंत्रणात मदत करेल.
इंजेक्शनऐवजी आता गोळीने दिलासा
आतापर्यंत ओजेम्पिक, वेगोवी व टूलिसिटीसारखी जीएलपी-१ औषधे इंजेक्शनच्या स्वरूपातच हृदयाचे संरक्षण करण्यास प्रभावी ठरली होती. राइबेल्ससमध्येही तेच सक्रिय घटक सेमाग्लूटाइड आहे, परंतु हे पहिले असे औषध आहे जे गोळीच्या रूपात घेतले जाऊ शकते.