आता दुर्गम भागांनाही उपग्रह इंटरनेट — महाराष्ट्रात ‘स्टारलिंक’सोबत भागीदारी
स्टारलिंकशी MoU करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य

प्रतिनिधी / मुबई, दि. 5 :
महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला असून यामुळे राज्यातील दुर्गम व अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.स्लिक आणि महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये झालेल्या या करारामुळे लो-अर्थ ऑर्बिट आधारित अत्याधुनिक इंटरनेट तंत्रज्ञान आता ग्रामीण शाळा, आरोग्य केंद्रे, आपत्ती नियंत्रण कक्ष, वन चौक्या, किनारी भाग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल दरी मिटविणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी एक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमास IT मंत्री ॲड. आशिष शेलार, विभागांचे प्रमुख सचिव, स्पेसएक्स/स्टारलिंक प्रतिनिधी लॉरेन ड्रेयर आदी मान्यवर उपस्थित होते. लॉरेन ड्रेयर यांनी “जिथे पारंपरिक पायाभूत सुविधा नाहीत, तिथेही इंटरनेट पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्रासोबतची भागीदारी हे याच दिशेतील ऐतिहासिक पाऊल आहे” असे सांगितले.
महाराष्ट्र – स्टारलिंक भागीदारी अंतर्गत 90 दिवसांचा प्रायोगिक टप्पा ठेवण्यात आला असून 30/60/90 दिवसांनुसार प्रगतीचा आढावा थेट मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या अंतर्गत
* आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आपले सरकार केंद्रांना उपग्रह इंटरनेट
* किनारी सुरक्षा व आपत्ती प्रतिसादासाठी संप्रेषण सुधारणा
* शिक्षण व टेलिमेडिसिनसाठी हाय-स्पीड सुविधा
* स्थानिक समुदाय व सरकारी यंत्रणांचे प्रशिक्षण
प्रायोगिक टप्पा यशस्वी झाल्यानंतर हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारला जाईल.
Starlink बद्दल
स्टारलिंक हे स्पेसएक्स कंपनीचे Low Earth Orbit उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित ब्रॉडबँड नेटवर्क आहे. स्पेसएक्स ही पुनर्वापरक्षम रॉकेट तंत्रज्ञानाची अग्रेसर कंपनी असून जगभर इंटरनेट कनेक्टिव्हिटी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवत आहे.

