पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी निवास प्रकाराची नोंदणी करा.
नाशिक पर्यटन संचालनायाचे आवाहन.
नाशिक जिल्हा वृत्त
नाशिक – वृत्तसेवा दि. 3 नोव्हेंबर, 2025
शासनाच्या पर्यटन संचालनालयाकडून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असुन पर्यटकांना सुरक्षित, अधिकृत आणि दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्हॅकेशन होम, पर्यटन अपार्टमेंट, पर्यटन व्हिला व होम स्टे यासारख्या निवास प्रकारांची अधिकृत नोंदणी करणे पर्यटन संचालनालयाने अनिवार्य केले आहे. यासाठी पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांनी आपल्या निवास प्रकाराची नोंदणी करावी, असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनायाचे उपसंचालक विजय जाधव यांनी केले आहे.
पर्यटकांचे आदरातिथ्य समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. होम स्टे, टुरिस्ट व्हिला, टुरिस्ट अपार्टमेंट या नव्या निवासी पर्यायांची सुविधा देण्यासाठी इच्छुक असलेल्यांना पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयात नोंदणी करण्यात येत आहे. याद्वारे पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवता येणार आहे. तसेच स्थानिक स्वयंपाक, मराठमोळा पाहुणचार, कुटुंबातल्या गप्पा गोष्टी यामुळे पर्यटकांचा प्रवास संस्मरणीय होणार आहे.
नोंदणीकृत निवासस्थळांना पर्यटन मान्यता प्रमाणपत्र देण्यात येते. ज्यामुळे विश्वास वाढतो व सुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता यासाठी शासनाने ठरविलेल्या मानांकांचे पालन सुनिश्चित होते. यामुळे पर्यटन क्षेत्रातील गुणवत्ता वाढते. नोंदणी केल्यामुळे पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि प्रचार माध्यमांवर प्रसिद्धी मिळते. यासह शासनाच्या पर्यटनविषयक विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, सबसिडी आणि प्रोत्साहनपर उपक्रमांचा लाभ नोंदणीकृत निवास व्यवसायिकांना घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान नाशिक -422001 कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 यावर तसेच 8390731737 या भ्रमणध्वनीवर, dditourism.nashik-mh@gov.in या ईमेलवर आणि www.maharashtratourism.gov.in या संकेस्थळास भेट द्यावी, असेही उपसंचालक जाधव यांनी केले आहे.

