बागलाण न्युज 
मंगळवार दि. ४ नोव्हेंबर
 प्रतिनिधी –  सटाणा
(बागलाण) : बागलाण पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळील मुख्य रस्ता चिखलाने माखलेला असल्याने तालुक्यातून पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाणथळ भाग निर्माण झाला आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सटाणा येथील बागलाण पंचायत समिती परिसरात दरवर्षीप्रमाणे चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पावसाळ्यात नियमितपणे मुरुम टाकून डागडुजी केली जाते, मात्र पाऊस पडताच रस्ता पुन्हा जैसे थे होतो. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सदर रस्ता तसेच पंचायत समितीचे आवार हे महसूल विभागाच्या हद्दीत येते. पुरवठा विभागाच्या अवजड वाहनांची ये-जा याच मार्गावरून होत असल्याने रस्त्याचे नुकसान अधिक होते. तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांची पंचायत समितीकडे नेहमी वर्दळ असते, मात्र या परिस्थितीमुळे वाहनधारक तसेच पायी जाणाऱ्यांना मनस्ताप होत आहे.
संजय टेकाळेसटाणा उपविभागीय अभियंता.“सदर जागा महसूल विभागाची आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे पंचायत समितीकडून खर्च करण्यास समस्या येते. महिनाभरापूर्वी आम्ही मुरुम टाकला होता, पण पुन्हा रस्ता खराब झाला. पुरवठा विभागाच्या अवजड वाहनांमुळे हे नुकसान होते.”
कैलास चावडेतहसीलदार बागलाण“महसूल विभागाकडून रस्ताकाम करण्यास कोणतीही अडचण नाही. पंचायत समितीला हवे असल्यास महसूल विभाग नाहरकत प्रमाणपत्र देऊ शकतो. आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल.”
				
					
